विकिपीडिया मोहीम (Marathi)

घर जाके गूगल कर लो, मेरे बारेमे विकिपीडियापे पढ लो

लुंगी डान्समध्ये शाहरुख खान

सत्यमेव जयते!

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या करामतीतून आज मानवाच्या भौतिक, तसेच बौद्धिक, सांस्कृतिक, संपत्तीचा खजिना ओसंडून वहात आहे. कल्पनातीत वेगाने माहितीची देवाण-घेवाण चालू आहे, व्यक्ती-व्यक्तींतील संवाद चालू आहेत. अशा ह्या आजच्या जगात दोन अगदी विरोधी प्रवृत्ती जगाचा कायापालट करत आहेत. एका बाजूने भौतिक संपत्तीतील विषमता वाढते आहे, तर तितक्याच झपाट्याने बौद्धिक, सांस्कृतिक संपत्तींतील विषमता घटते आहे. भौतिक संपत्तीच्या विषमतेतून निसर्गाच्या नासाडीचा वेग वाढतो आहे, तर बौद्धिक संपत्तींतील समतेचा एक महत्वपूर्ण आविष्कार असलेल्या माहिती हक्क कायद्यासारख्या लोकाभिमुख कायद्यांच्या बळावर ह्या विध्वंसाला रोकण्यात येत आहे. सजग सुजाण नागरिक हेच समाजाच्या प्रगतीचा आधारस्तंभ आहेत, तेव्हा सर्व प्रकारची खरी-खुरी माहिती सर्वांना सहजी उपलब्ध करून देण्यासाठी झटणे हे आपणा सर्व नागरिकांचे, आणि अर्थात्आपल्या शासनाचेही कर्तव्य आहे.

शासनाची वाकडी चाल

दुर्दैवाने शासकीय यंत्रणा ह्या संदर्भातील आपले कर्तव्य बजावत नाही. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत सिंचनव्यवस्थेचा ऊहापोह चालू आहे. वेगवेगळ्या वेळी कृषि व जलसिंचन विभागांनी वेळोवेळी पुरवलेले आकडे  एकमेकांशी विसंगत आहेत; बहुधा सगळेच चुकीचे असावे. महाराष्ट्रातील नद्या मोठ्या प्रमाणावर कायद्याच्या मर्यादेबाहेर, बेहद्द प्रदूषित झालेल्या आहेत, परंतु राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांबद्दल काहीही नीट माहिती पुरवत नाही. अनेकदा अशा प्रदूषणापोटी मोठ्या प्रमाणावर नद्यांतील मासे मरतात, पण अशा मीनमहामृत्यूंची नोंद ना मस्त्योद्योग विभाग ठेवतो, ना राज्य प्रदूषण मंडळ. संपूर्ण सह्याद्री प्रदेशात दगड खाणी त्या बरोबरच्या स्टोन क्रशर्सच्या उपद्रवाने लोक हवालदील झालेले आहेत. जनता जास्त जागरूक असलेल्या केरळात जेव्हा कुठे शासनयंत्रणेला हलवले गेले, तेव्हा विधान सभेला सदर केलेल्या अहवालात कबूल केले गेले की राज्यातील ९०% स्टोन क्रशर्स जिल्हाधिकाऱ्यांच्या नोंदणीशिवाय पंचायतीच्या परवानगीविना चालवले जाताहेत. जेव्हा केन्द्र शासनानेच नेमलेल्या पश्चिम घाट परिसर तज्ञ गटाने असे नाना गैरप्रकार व्यवस्थित पुराव्यानिशी चव्हाठ्यावर आणले, तेव्हा शासनाने प्रथम त्यांचा अहवाल दडपला, न्यायालयीन आदेशाने भाग पडल्यावर केवळ इंग्रजीत उपलब्ध करून दिला. कळस म्हणजे मग महाराष्ट्र शासनाने ह्या अहवालाचा जाणून-बुजून विपर्यास करत लोकांची दिशाभूल करणारा मराठीतला तथाकथित सारांश आपल्या संकेतस्थलावर चढवला.

सामाजिक संवाद माध्यमे

उघड आहे की लोकांना स्वतःच झटून सर्व प्रकारची खरी-खुरी माहिती पुढे आणली पाहिजे. सुदैवाने आपल्या लोकशाहीत वृत्तपत्रे, टीव्ही वाहिन्या लोकांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवरची सच्ची माहिती बऱ्याच प्रमाणात उपल्ब्ध करून देतात. उदाहरणार्थ, गोव्याच्या जंगलांत वाघ नाहीतच हा शासकीय दावा चुकीचा असल्याचे अशा बातम्यांतून स्पष्ट झाले. तसेच, नदीत होणाऱ्या मीनमहामृत्यूंचीही अशा माध्यमांत नोंद होत राहते. फेसबुकसारख्या सामाजिक संवाद माध्यमांतही अशा वार्ता, छायाचित्रे, व्हिडियो येत राहतात. पण हैद्राबादच्या Save Our Urban Lakes (SOUL) अशा काही संघटनांनी केलेले पद्धतशीर प्रयत्न वगळता ही माहिती विखुरलेली राहते. नीट संकलित होत नाही. लोकांनीच शिस्तबद्ध अशा सामाजिक संवाद माध्यमांतून ही नीट संकलित केली तर ह्या बाबतीत प्रगति होऊ शकेल. आज लोकप्रिय असलेल्या फेसबुकसारख्या सामाजिक माध्यमांतील खूपशी मांडणी स्वयंकेन्द्रित, एकांगी, पूर्वग्रहदूषित, भरकटणारी असल्याने त्यातली किती सच्ची, किती कच्ची, किती लुच्ची हे सांगणे कठीण असते. उलट वृत्तपत्रे, टीव्ही ही माध्यमे हजारो लोकांकडून सतत चिकित्सक वृत्तीने पारखली जात असल्याने अधिक जबाबदारीने व बहुतांश विश्वसनीय महिती पुरवतात. तेव्हा वृत्तपत्रे, टीव्हीवरील बातम्या, शास्त्रीय अभ्यास, वेगवेगळे अधिकृत दस्तावेज यांसारख्या माहिती स्रोतांचा आधार घेऊन लोकांनी स्वतंत्रपणे, पण पूर्ण जबाबदारीने एखाद्या सामाजिक संवादपीठाद्वारे संकलित केलेली माहिती हाच आम जनतेसाठी खऱ्या-खुऱ्या माहितीचा उत्तम ठेवा ठरू शकेल.

विकिपीडिया

बॉलिवुड ज्याचे गोडवे गातोय ते विकिपीडिया हे असेच एक विश्वसनीय सामाजिक संवादपीठ आहे. विकिपीडिया हा एक वेब आधारित जगातली सर्व माहिती सर्वांपर्यंत, सर्वांच्या भाषेत पूर्ण विनामूल्य पोचवण्याचा निरपेक्ष सहकारी उपक्रम आहे. २००० साली हा सुरू झाला, तेव्हा त्यात केवळ विशेषज्ञांनी लिहिलेले ज्ञानकोशाच्या धर्तीवरील लेख असतील अशी संकल्पना होती. पण असे लेख विनमूल्य लिहा ह्या आवाहनाला तज्ञांचा प्रतिसाद न मिळाल्याने २००१ साली त्याचे एका सर्वसमावेशक उपक्रमात रूपांतर केले गेले. विचार झाला की विद्वानही खूपसे ज्ञान इतरांनी लिहिलेले वाचूनच कमावतात, मग सामान्य जनही ते करू शकतील. ह्यात चुका होतील, पण हे लेखन सर्वांना चौकसपणे तपासायला, सुधारायला उपलब्ध करून देऊ; अशा पडताळणीतून चुका दुरुस्त होतील, विशेषज्ञांनी लिहिलेल्या दर्जाचेच लेख बनू शकतील. प्रतिष्ठित वैज्ञानिक पत्रिकांनी केलेल्या निरनिराळ्या अभ्यासांतून हे प्रत्यक्षात उतरते हे असे सिद्ध झालेले आहे.

सर्वसंमत आचरण नियमावली

हे सगळे पन्नास-साठ हजार उत्साही विकिपीडियाकारांच्या, लेख सुधारण्याच्या, नवे लेख लिहण्याच्या खटटोपीचे फलित आहे. ह्या आधुनिक संप्रदायातील मंडळींनी आपली नेटकी आचरणनियमावली आखून सर्वसहमतीने अंमलात आणली आहे. विकिपीडियातील लेखांत स्वतःच्या निरीक्षणांचा समावेश केला जात नाही; कोठे तरी, शास्त्रीय साहित्यातील अथवा सर्वांसमोर येणाऱ्या वृत्तपत्रांतील, टीव्हीवरील विश्वसनीय बातम्यांतून ही माहिती संकलित केली जाते. मग ते संदर्भ देत कोणतीही बाजू न घेता केवळ वास्तवाच्या आधारावर जे उभे राहते ते चित्र रेखाटले जाते. विकी म्हणजे भराभर, तेव्हा विकिपीडियातील लेख नुसते विश्वसनीयच नसतात, तर झपाट्याने उभे राहतात. २००४ डिसेंबरमध्ये त्सुनामी लोटल्या- लोटल्या, मुख्यत: बातम्यांच्या आधारे दोन दिवसांत १००० लोकांनी भर घालत त्सुनामीवरचा वास्तवाचे सुव्यवस्थित चित्रण करणारा उत्तम लेख तयार केला.

नेतेमंडळींची झाडाझडती

विकिपीडिया हेही फेसबुक, ट्विटरसारखेच सामाजिक संवादपीठ आहे. विकिपीडियात प्रत्येक लेखाबरोबर एक चर्चेचे पान असते, त्यावर मुख्य लेखाची शिस्त बाजूला ठेवून जास्त मोकळेपणे वादावादी चालू शकते. विकिपीडियात कोणीही नाव नोंदवू शकतो, आणि नोंदवताच तिला किंवा त्याला एक उपयोगकर्त्याचे पान प्राप्त होते. त्यावरील चर्चा-पानाद्वारेही निरनिराळे संवाद शक्य आहेत. पण शिस्तबद्ध विकिपीडियात फेसबुकवर होऊ शकते तसे स्वयंकेन्द्रित, एकांगी, पूर्वग्रहदूषित, भरकटणारे लेखन शक्य नाही. त्यामुळे अमेरिका, युरोपात ह्या संवादपीठाला वेगळेच महत्व आले आहे. उदाहरणार्थ, इथल्या राजकीय नेत्यांवरच्या, पक्षांवरच्या लेखांत लोक त्यांची नीट झाडा-झडती घेतात. निवडणुकीच्या वेळी त्यांनी काय आश्वासने दिली व नंतर ती पाळली की मोडली हे पुराव्यानिशी नमूद करतात. विकिपीडियात मुक्तद्वार असल्याने आरंभी राजकारण्यांनी आपल्या हस्तकांद्वारे आपल्याला गैरसोयीचे उल्लेख काढून टाकण्याची शिकस्त केली. परंतु, विकिपीडियात लेखांच्या सर्व आवृत्त्या लेखाच्या इतिहासाच्या पानावर जपलेल्या असतात व कोणत्या संगणकाद्वारे बदल केले गेले ह्याचीही नोंद असते. तेव्हा राजकारण्यांचे हे गैरवर्तन लोकांच्या डोळ्यात भरून, त्यांची नाचक्की झाली; ते वठणीवर आले. ह्या संदर्भात मी लिहिलेला लेख दैनिक सकाळमध्ये शनिवार डिसेंबरला प्रकाशित झाला आहे. पहाhttp://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5588311534579672485&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20151205&Provider=%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5%20%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B3&NewsTitle=%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%20%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A5%87

स्वतंत्र माध्यम

विकिपीडियावर कोणत्याही सरकारची पकड नाही, जाहिराती नसल्याने पैशाचा दबाव नाही, तेव्हा निर्भीडपणे वस्तुस्थिती पुढे आणण्याचे हे अत्युत्कृष्ट माध्यम आहे. ह्या माध्यमाचा वापर करून भारताची आम जनता आपल्या अनुभवांचे समस्यांचे सुव्यवस्थित विवेचन सर्वांना सहज उपलब्ध अशा मराठी (https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 ), कोंकणी (https://gom.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8B:MadhavDGadgil&action=edit&redlink=1), हिंदी (https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 ) अथवा इंग्रजी (https://en.wikipedia.org/wiki/Main_Page), तसेच इतर १८ भारतीय भाषांतील विकिपीडियातील लेखांच्या स्वरूपात सर्वसहभागाने थेंबे-थेंबे-तळे-साचे अशा पद्धतीने रचत- रचत उपलब्ध करून देऊ शकेल.

माहितीचे स्रोत

विकिपीडियातील लेखन विशिष्ट विषयांच्या संदर्भात असते, व प्रत्येक लेखाबरोबर त्यातील प्रतिपादन कशाच्या आधारावर केलेले आहे ह्याचा पुरावा सादर करावा लागतो. हा पुरावा शास्त्रीय लेखन, पुस्तके, अधिकृत दस्तवेज किंवा विश्वसनीय मानण्या योग्य वृत्तपत्रांतील, टीव्ही वाहिन्यांतील बातम्या ह्या स्वरूपात असू शकतो. सरकारी जिल्हा गॅझेटियर्स, वन विभागाच्या कार्य आयोजना, महानगरपालिकांनी सादर केलेले पर्यावरणीय सद्यःस्थितीबद्दलचे अहवाल, जैवविविधता कायद्याअंतर्गत स्थानिक जैवविविधता समित्यांनी बनवलेली जैवविविधता नोंदणी पत्रके, निवडणूक आयोगाला उमेदवारांनी पुरवलेली माहिती, माहिती हक्काखाली नागरिकांनी प्राप्त केलेली अधिकृत माहिती, रूपेश पाटकरांनी लिहिलेले कळणे आंदोलनावरील पुस्तक, साधल्यांचे भूतखांबचा लढा पुस्तक, चितळ्यांचा जलसिंचन घोटाळ्यावरील अहवाल, पश्चिम घाट तज्ञ समितीचा अहवाल, केरळ विधानसभेच्या समितीचा बेकायदेशीर दगडखाणींसंदर्भातील अहवाल, दोडामार्ग वन्य जीव कॉरिडॉरच्या संदर्भातील उच्च न्यायालयाचे निवाडे, इतर वृत्तपत्रीय बातम्या [ उदा. http://www.dnaindia.com/india/report-overlooking-wildlife-corridor-and-rich-water-source-moef-clears-mopa-airport-in-goa-] हे सर्व असा स्वीकारणीय आधार ठरू शकतील.

लेखांचे विषय

विकिपीडिया इंग्रजी, मराठी, कोंकणी, हिंदी तसेच इतर १८ भारतीय भाषांत वेगवेगळ्या तऱ्हेचे लेख लिहिता येतील. ते विवक्षित विषयांवरील असू शकतील, उदाहरणार्थ, जलप्रदूषण कायदा, वनाधिकार कायदा, नॅशनल ग्रीन ट्रायब्यूनलची कार्यकक्षा, देवरायांची परंपरा, मीनमहामृत्यु, गोव्यातील पर्यावरण संबंधित आंदोलनांचा इतिहास, प्रस्तावित मोपा विमानतळ, चितळ्यांचा जलसिंचन घोटाळ्यावरील अहवाल, लवासा गिरिनगरी, गोव्यातील खाणींच्या संदर्भातील पर्यावरणीय आघातांबद्दलचे अहवाल, गोव्यात झालेल्या खनिजवाहतुकीतील अपघातांची यादी, मुंबई-पुणे द्रुतमार्गावरी झालेल्या अपघातांची यादी, देशात कार्यशील असलेल्या स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समित्यांची यादी, केपे तालुक्यातील खाणी, दोडामार्ग तालुक्यातील वन्यजीव, पंचगंगेत प्रदूषणामुळे झालेले माशांचे मत्यु, लोकसभा सदस्यांची शैक्षणिक पात्रता इत्यादि, इत्यादि.

भौगोलिक चौकट

शिवाय हे लेख विवक्षित शहरांबद्दल (उदा. पुणे), शहरांतील वॉर्ड अथवा मोहल्ल्यांबद्दल(उदा. पुण्यातील कोथरूड), गावांबद्दल (उदा. कळणे, वारखंड), तालुक्यांबद्दल (उदा. दोडामार्ग, पेडणे), जिल्ह्यांबद्दल (उदा. कोल्हापूर, उत्तर गोवा) अथवा नद्यांबद्दल (उदा. पंचगंगा, मुळा-मुठा)  असू शकतील. अशा स्थलविशिष्ट लेखांची सुरुवात करायला काही तरी अधिकृत माहितीचा आधार हवा. असा उत्तम आधार म्हणजे भारतीय जनगणना २०११ चा डेटाबेस (http://www.censusindia.gov.in/2011census/dchb/DCHB.html, Goa District Census Handbook http://www.censusindia.gov.in/2011census/dchb/goa.html) हा आहे. ह्या डेटाबेसमध्ये प्रत्येक स्थलाला एक विवक्षित स्थल निर्देशांक दिलेला आहे. महाराष्ट्रात एकाहून जास्त वेग-वेगळी लोणी, मेंढा, अथवा वडगाव नावाची गावे आहेत; त्या प्रत्येकाला वेगळा जनगणना स्थल निर्देशांक दिलेला आहे. मध्य प्रदेशात एक सागर नावाचे शहर व त्याच नावाचा जिल्हा आहे. त्या सागर शहराला व सागर जिल्ह्याला वेगवेगळे जनगणना स्थल निर्देशांक दिलेले आहे, शिवाय कर्नाटकातील सागर ह्या गावाला दिलेला जनगणना स्थल निर्देशांक अर्थातच वेगळा आहे. ह्या तरतुदीमुळे भारतातील कोणत्याही स्थलाचा पूर्णतः निःसंदिग्ध उल्लेख करणे शक्य झाले आहे. ह्याला पूरक म्हणून गूगल अर्थवर जाऊन त्या स्थलाचे अक्षांश, रेखांश व समुद्रसपाटीपासूनची उंची वाचून तीही सहज नोंदवता येईल.

प्राथमिक लेख

ह्या भारतीय जनगणना २०११ च्या डेटाबेसमधील माहितीचा वापर करत छोटेखानी लेख संगणकाद्वारे बनवण्यासाठी प्रशांत पवार (ppawar@msn.com, ९५४५०५०६६० ) ह्यांनी स्काला ह्या आधुनिक संगणक भाषेतील कोड तयार केलेले आहे. अशा प्रकारे मराठी विकिपीडियात लिहिलेला हळदी(करवीर), रुकडी(हातकणंगले) व परिते ह्या शीर्षकांचे तीन प्राथमिक, पायाभूत लेख https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A4%A6%E0%A5%80_(%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0)

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80_(%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%87)

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87

येथे उपलब्ध आहेत. इंग्रजी विकिपीडियाच्या प्रारंभी अमेरिकेतील जनगणनेतील ४०,००० स्थलांबद्दल असेच संगणकाद्वारे लिहिलेले लेख विकिपीडियावर चढवण्यात आले होते, व भराभर तिथ-तिथल्या स्थानिक नागरिकांनी त्यांत उत्तम भर टाकली होती. परंतु आपल्याकडे शाहरुखखान मेरे बारेमे विकिपीडियापे पढ लोअसे गात असला तरी विकिपीडिया या उपक्रमात आपण स्वतः सहभागी होऊ शकतो बद्दल फारशी जागरुकता नाही. उदाहरणार्थ, इंग्रजी विकिपीडियात Pune Bus Rapid Transit System बद्दल एक लेख आहे. पण तो केवळ अधिकृत माहितीने भरलेला आहे. ह्या विषयावर अनेक वर्षे बरीच उलट- सुलट चर्चा चालली आहे, वृत्तपत्रांत तऱ्हतऱ्हेच्या बातम्या येत असतात, पण विकिपीडियावरील सध्याच्या लेखात ह्या कशाचाही मागमूस नाही. लेखासोबतचे चर्चेचे पान जवळपास कोरडे आहे. सजग पुणेकर सहज विकिपीडिया ह्या माध्यमाचा वापर करत Pune Bus Rapid Transit System च्या वस्तुस्थितीबद्दलचे चित्र उभे करू शकतील, पण हे कोणाला सुचलेले नाही, व असे चित्र दुसऱ्या कोणत्या माध्यमातही उपलब्ध नाही.

जिव्हाळ्याचे विषय

लोकांमधील जागरुकतेच्या अभावी आपल्याला जरी जनगणनेत समाविष्ट अशा भारतातील हजारो जिल्हे, तालुके, शहरे व गावांबद्दल संगणकाद्वारे निर्मित लेख विकिपीडियावर अमेरिकेच्या धर्तीनेच यांत्रिक पद्धतीने आपोआप चढवता येतील, तरी ते फारसे फलप्रद ठरेल असे वाटत नाही. त्या ऐवजी ज्यांना ज्यांना हवे त्यांनी मला madhav.gadgil@gmail.com किंवा श्री प्रशान्त पवार (ppawar@msn.com, ९५४५०५०६६०) ह्यांस ईमेलने विचारणा केल्यास असे संगणकाद्वारे लिहिलेले प्राथमिक लेखांचे मसुदे http://www.madhavgadgil.in/  ह्या संकेतस्थलावर उपलब्ध करून देण्यास आम्ही उत्सुक आहोत. लोकांच्यात विकिपीडियाबद्दल जस-जशी जागरुकता व साक्षरता निर्माण होईल, तस-तसे हे वेबवर उपलब्ध करून दिलेले साहित्य वापरून नागरिक त्यात भर घालण्यास सुरुवात करू शकतील. उदाहरणार्थ, कोल्हापूर जिल्ह्यातील हळदी ह्या पंचगंगा नदीच्या परिसरातील गावात नदीचे प्रदूषण, त्यातून होणारे आरोग्यावरील परिणाम, माशांचे महामृत्यु असे कित्येक जिव्हाळ्याचे विषय आहेत. त्यांवर माहितीची भर घालण्यास वृत्तपत्रांतील अनेक बातम्यांचा आधार आहे. आता वर उल्लेखिल्याप्रमाणे आपल्या गावाचा प्राथमिक लेख विकिपीडियात उपलब्ध झालेले हळदी ग्रामस्थ अशा उपक्रमात सहभागी होतील अशी उमेद आहे. जागरूक नागरिक अशा प्रयत्नांचा एक महत्वाचा भाग म्हणून विषयाशी संबंधित अशी छायाचित्रे, ध्वनिमुद्रिते, व्हिडियोफिती बनवून, त्यांच्या विषयाबद्दलची महत्वाची माहिती त्यांसोबत नोंदवून Wikimedia Commons ह्या विकिपीडियाच्या उपक्रमाद्वारे वेबवर चढवू शकतील. हे साहित्य सर्वांना विनामूल्य उपलब्ध होईल, पण वापरताना मूळ कर्त्याला पूर्ण श्रेय दिले जाईल. असे साहित्य विकिपीडियातील लेखांत सहजी समाविष्ट करता येईल. ह्याखेरीज जागरूक नागरिक सामाजिक बांधिलकी असलेल्या कायदेपंडितांच्या मदतीने जनहितयाचिका दाखल करवून, तसेच सर्व थरांवरच्या लोकप्रतिनिधींद्वारे जिल्हा परिषदा, विधान सभा, लोक सभा अशा मंचांत प्रश्न विचारून अधिकृत माहिती मिळवू शकतील. अशा सर्व प्रयत्नांसाठी उपयुक्त असे प्रशिक्षण ज्यांना हवे त्यांना देण्याचे प्रयत्न कोल्हापूर जिल्ह्यात सुबोध कुळकर्णींच्या (९४२२९०७३३०, subodhkiran@gmail.com ) पुढाकारातील एक गट करत आहे. असेच इतर उपक्रम दोडामार्ग-सावंतवाडीतील पर्यावरण-पोषक विकासनीतीबद्दल पश्चिम घाट परिसर तज्ञ गटास निवेदन सादर करणारी गावे, मोपा विमानतळाच्या परिसरातील पर्यावरणावरील आघातांबद्दल जागरूक गावे, गडचिरोली- चंद्रपूर जिल्ह्यांतील सामूहिक वनसंपत्तीच्या व्यवस्थापनात कार्यरत असलेली गावे, महाराष्ट्र जनुक कोश ह्या संशोधन प्रकल्पात सहभागी झालेले गट करतील अशी जबरदस्त आशा आहे.

सामाजिक लेखा परीक्षा

एकदा जर का ह्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला तर ह्यातून खूप काही साधता येईल. कोठल्याही स्थळाबद्दलच्या लेखाच्या चर्चेच्या पानावर नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या विषयाचा उल्लेख करून पत्रकारांना त्याचा अभ्यास करून बातम्या द्या असे सुचविता येईल. ह्या मार्गाने शोध पत्रकारितेसाठी अनेक विषयांकडे पत्रकारांचे लक्ष वेधले जाऊन त्यांचाही चांगला फायदा होऊ शकेल. उदाहरणार्थ, एखाद्या गावात धरणाचे पाणी पोचणे अपेक्षित आहे, पण कालवे न बांधले गेल्यामुळे वर्षानुवर्षे पोचलेले नाही अशी परिस्थिति असल्यास एखाद्या शोध पत्रकाराने त्या व परिसरातील इतर गावांचा नीट अभ्यास करून बातमी देण्याचे ठरवल्यास त्या पत्रकारालाही खाद्य मिळेल व ह्या विषयावरची माहिती सुव्यवस्थितपणे संकलित होणे सुरू होईल. मग अशा बातमीतील माहितीचा आधार घेऊन विकिपीडियात ह्यावर एक कायम स्वरूपाचे माहिती भांडार निर्माण होऊ शकेल. एका दृष्टीने ही एक सामाजिक लेखा परीक्षेची – social audit -ची पूर्णपणे पारदर्शी, स्वयंप्रेरित प्रणाली म्हणून विकसित होऊ शकेल. अशा सामाजिक लेखा परीक्षेसाठी अगणित विषय पुढे येऊ शकतात. मासल्यादाखल काही उल्लेख करायचे तर रोहयोत रोजगार मिळण्यातील विलंब, वन हक्कासाठी केलेले दावे रखडत असणे, नद्यांवर बांधकामांचे अतिक्रमण, समुद्रकिनाऱ्यावर खाजगी हॉटेलांने जबरदस्तीने केलेला कब्जा, सार्वजनिक स्वच्छतागृहांतील सुविधा, शहरात दुचाकीस्वारांनी पदपथावर भरधाव गाडी चालवून पादचाऱ्यांचा जीव धोक्यात आणणे, इत्यादि, इत्यादि. अशा नानाविध विषयांवर योग्य स्रोतांतून नेटकी माहिती मिळवून ती विकिपीडियातील लेखांत समाविष्ट करता येईल.

विकिडेटा

विकिपीडियाशी संलग्न अशा विकिडेटा ह्या नव्या उपक्रमातून अशा माहिती संकलनाला एक नवेच बळ मिळू शकेल. ह्या सुविधेतून केवळ इंग्रजी नव्हे, तर भारतातील मराठी, हिंदी, कानडी, मल्याळी अशा विविध भाषांतील विकिपीडियातील लेखांतील माहिती वेगवेगळ्या भाषांच्या माध्यमांतून उचलून विकिडेटात संकलित करता येईल. पूर्ण भारतात देवराया ही निसर्ग रक्षणाची परंपरा जिवंत आहे, एवढेच नव्हे तर चन्द्रपूर जिल्ह्यातील पाचगावसारख्या गावांत नव्याने मिळालेल्या सामूहिक वनसंपत्तीवर अशा नव्या मोठ्या आकाराच्या देवराया प्रस्थापित होऊ लागल्या आहेत. देवराई आणि इतर भाषांतील देवपान, देवरकाडु, सर्पकावु, ओरान, sacred grove अशा शब्दांच्या आधारे अनेक ठिकाणी विखुरलेल्या देवरायांची माहिती झटाझट संकलित करता येईल. ही परंपरा मानणारे समाज परस्परांच्या संपर्कात येऊ शकतील. तसेच माशांचे मोठ्या प्रमाणावर मृत्यु, fish mass mortalities, अशा काही संज्ञांच्या आधारे भारतभर घडणाऱ्या अशा दुर्घटांची माहिती संकलित करत-करत एक अखिल भारतीय प्रदूषण पीडित मस्त्योद्यागी मंच प्रस्थापित करता येईल. अर्थात्‍ विकिपीडिया प्रकल्पाची ह्या संदर्भातील भूमिका ही अशा मंचाला एक द्रुतज्ञानपीठ उपलब्ध करून देण्यापुरती मर्यादित राहील. ह्या द्रुतज्ञानपीठाचे एकमेव उद्दिष्ट पूर्णतः तटस्थ वृत्तीने वस्तुनिष्ठ ज्ञानसंकलन, ज्ञानसाधना हे असेल. ह्या ज्ञानभांडाराच्या आधारे इतरांनी कृतिकार्यक्रम अवश्य हाती घ्यावेत, पण असे कृतिकार्यक्रम हे ज्ञानपीठाचे उद्दिष्ट नाही, ते कृतिकार्यक्रम त्याच्या कक्षेबाहेर राहतील.

आशा-आकांक्षा

विद्येचा छंद ज्यांना त्यांच्यासाठी सद्यःकाल हे एक सुवर्णयुग आहे. ह्याचा एक मोठा आधार असा विकिपीडिया हा पुरोगामी, सहकाराधिष्ठित उपक्रमसर्व मानवी ज्ञान सर्वांना, त्यांच्या, त्यांच्या भाषेत सहजी व पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून देणेहे ध्येय डोळ्यासमोर ठेवून चौदा वर्षांपूर्वी सुरू केला गेला. ह्या उद्दिष्टाकडे इंग्रजी विकिपीडियाने अचाट वेगाने झेप घेतली आहे. ही सारी विज्ञान-तंत्रज्ञानाची किमया आहे. विज्ञानाच्या ह्या यशाचे रहस्य विज्ञानाची खुली, सर्वांना मुक्त प्रवेश देणारी, कोणाही व्यक्तीची अधिकारवाणी न मानणारी, केवळ वस्तुनिष्ठता व तर्कशुद्धता हे दोन निकष अंगीकारणारी कार्यप्रणाली आहे. ह्या कार्यप्रणालीतून विज्ञान सर्वांना मुक्तपणे उपलब्ध असे नवनिर्मित ज्ञान झपाट्याने विकसित करते. असा खुलेपणा हे विज्ञानाचे व्यवच्छेदक लक्षण असले तरीही ज्ञानावर मक्तेदारी प्रस्थापित करण्याचा विशेषज्ञांचा प्रयत्न अथक चालू राहतो, त्याला विरोध करणे हे सर्व विज्ञानप्रेम्यांचे महत्वाचे कर्तव्य आहे. खरे तर ज्ञानाचा- विज्ञानाचा आवाका अफाट आहे; आपला परिसर, भोवतालचा समाज ह्यांबद्दलचे वास्तव हेही ज्ञानसाधनेचा भाग आहेत. ह्याचे काही ना काही ज्ञान सर्वांपाशीच असते, तेव्हा सर्वांनी मिळून अशा विषयांची जोपासना करावी हे सहजसह्क्य आहे, व श्रेयस्कर आहे. विकिपीडिया हे ह्या दिशेने उचललेले महत्वाचे पाऊल आहे. आज आधुनिक माहिती तंत्रज्ञानामुळे भाषेचा अडसर भराभर दूर होत आहे. अनेक भारतीय भाषांतील विकिपीडियांत विखुरलेली माहिती एकत्रित आणण्याची विकिडेटाची क्षमता ही या प्रगतीचीच द्योतक आहे. तेव्हा बहुभाषीय भारतात आपण सर्वसामान्यांना ह्या उपक्रमात सामील करून घेऊन आपल्या समाजाच्या, परिसराच्या वास्तवाचे नेटके चित्र उभे करण्यासाठी झटू या; हे राष्ट्रबांधणीला एक चांगले योगदान ठरेल.

 

Comments